महाराष्ट्र राज्य लॉटरी कंत्राटी कर्मचार्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
मुंबई,23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
महाराष्ट्र राज्य लॉटरी विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणार्या 22 कर्मचार्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कर्मचार्यांवर होणार्या अन्यायाविरोधात चर्चा करण्यात आली. शासनाने कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून सामावून घेणे, अशी या कर्मचार्यांची मागणी आहे. लॉटरी आयुक्ताशी बोलून त्यांची समस्या सोडवण्याचे आश्वासन राज यांनी कर्मचार्यांना दिले.
महाराष्ट्र राज्य लॉटरी नवी मुंबईतील वाशी वित्त विभागात गेल्या 16 वर्षांपासून हे कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर कामावर आहेत. तुटपुंज्या पगारात ते दिवस काढत आहे. या कर्मचार्यांना मासिक 8 हजार 900 रुपये पगार दिला जात आहे. 2011 मध्ये सेवा नियमित करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाकडे (मॅट) शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी याचिका दाखल केली होती.
2016 ला मॅटने या कर्मचार्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निकाल दिला होता. मात्र, शासन स्तरावरून या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे. या विषयात राज ठाकरे यांनी लक्ष घालावे, यासाठी कर्मचार्यांनी कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी कर्मचार्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे आवाहन राज यांनी दिल्याचे गणेश कदम यांनी सांगितले.
Post a Comment