धनंजय मुंडे यांच्याविरोधात डिसेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल होणार
मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात जगमित्र साखर कारखान्यास दिलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून दिलेला 40 लाख रूपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी डिसेंबरपर्यंत दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर ही माहिती राज्य सरकारने दिली आहे.
50 लाख रुपयांत अंबाजोगाई तालुक्यातील पुस(जि. बीड) येथील गीते यांची जमीन घेण्यात आली. 7 जून 2012 रोजी जमिनीचे खरेदीखत करण्यात आले. त्यावेळी गीते यांचा मुलगा बाळासाहेब, भावाची मुले राजाभाऊ व प्रभाकर आणि नातू आत्माराम यांना साखर कारखान्यात नोकरी देण्याची हमी देण्यात आली होती. मुलगा, नातू आणि भावाच्या दोन मुलांना दर महिन्याला तीन हजार रूपयांप्रमाणे सहा महिने काम देऊन पगार दिलेला आहे. जमिनीच्या व्यवहारात ठरल्याप्रमणे प्रथम एक लाख व नंतर 7 लाख 81 हजार 250 रूपयांचा धनादेश दिला. आ. धनंजय मुंडे यांनी परळीच्या बँक ऑॅफ महाराष्ट्रचा 40 लाख रूपयांचा धनादेश दिला. गीते यांना दिलेला धनादेश न वटताच परत आला आणि तीन वर्षे पाठपुरावा करूनही रक्कम देण्यात आली नाही. गीते यांनी शेवटी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नव्हता. अॅड. व्ही. डी. गुणाले यांच्यावतीने गीते यांनी याविरोधात खंडपीठात धाव घेतली असता खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
Post a Comment