Header Ads

ad

आदिवासी, शेतकर्‍यांच्या सर्व मागण्या मान्य, सरकारचं लेखी आश्‍वासन

मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी काढलेला ’उलगुलान मोर्चा’ मिटण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्यांना लेखी आश्‍वासन देण्यात आल्याची माहिती गिरीश महाजनांची दिली आहे.
शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर शेतकर्‍यांना मागण्या मान्य करण्यात आल्या. पुढील तीन महिन्यात सर्व प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याचं लेखी आश्‍वासन सरकारनं मोर्चेकर्‍यांना दिलं आहे.
आदिवासी जमिनीच्या पट्टेधारकांना सर्व दुष्काळी सवलत देण्यात येणार आहेत. तर शेतीसाठी खवटी अनुदान देण्याबाबतही निर्णय झाला असल्याची माहिती सरकारनं दिली.
गैरआदिवासी आणि आदिवासींना तीन पिढीची राहिवासीची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकर्‍यांची होती. याबाबत राज्य केंद्राला शिफारस करणार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. वन्य जमीन पट्ट्याच्या प्रकरणातील 80 टक्के दावे सरकारने फेटाळले होते.
या दाव्यांचे सरकार पुनर्रवकलोकनही करणार आहे. सर्व दावेदारांची नावं एकाच सातबार्‍यावर न चढवता स्वतंत्र सात बारे दिले जाणार आहेत.
वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदिवासी भागातील गावच्या 50 टक्के लोकांची उपस्थिती अनिवार्य होती. मात्र आता गावाऐवजी पाड्याचा घटक ग्राह्य धरला जाणार आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात 50 गावात 25 ते 30 हजार बंगाली शरणार्थी आहेत. ज्याप्रमाणे सिंधी शरणाथींर्ना पुनर्वसन केले त्याप्रमाणे बंगाली शरणाथींर्ना समान कायद्यानुसार पुनर्वसित करणार असल्याचं सरकारनं मान्य केलं आहे.
आझाद मैदानात ठिय्या
वनाधिकार कायदा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवर सरकारने दिलेली आश्‍वासनं पूर्ण न झाल्याने हा मोर्चा काढण्यात आला होता.
राज्याच्या कानाकोपर्‍यातून शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आझाद मैदानावरुन उठणार नाही, अशी निर्धार मोर्चेकर्‍यांनी केला होता.
शेतकर्‍यांची प्रकृती बिघडली
या मोर्चातील सुमारे 400 आंदोलकांची तब्येत बिघडली. सरकारकडून त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. काही संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या आणि त्यांनी खाण्यापिण्यासह औषधं पुरवली. ठाण्यातून मुंबईच्या दिशेने अनवाणी येणार्‍या या शेतकर्‍यांच्या पायांना जखमा झाल्या होत्या. तर काही जण तापामुळे आजारी पडले.

No comments

Thank you for your feedback.