Header Ads

ad

मुंबईच्या प्रगतीत उद्योजकांचा मोलाचा वाटा - उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
उद्योजकांच्या सकारात्मक पाठिंब्यामुळेच मुंबई परिसरात उद्योगाची भरभराट झाली असून राज्य शासनाच्या विविध योजना यशस्वी होत असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले.
बॉम्बे इण्डस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रसन्न डोंगरे यांची यंदा निवड झाली असून त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.देसाई बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अजित सिंग अहुलवालिया, गौतम ठाकूर, नयन पटेल यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.देसाई यांनी सर्वप्रथम नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसन्न डोंगरे यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, उद्योजकांच्या सकारात्मक पाठिंब्यामुळे मुंबई उद्योग क्षेत्रात आज देशात आघाडीवर आहे. राज्य शासनाच्या वतीने उद्योग विभाग राबवित असलेल्या विविध योजना उद्योजकांमुळे यशस्वी होत आहेत.
मुंबईत उद्योग वाढीसाठी शासन विविध योजना राबवित आहे. मेट्रो, ट्रान्स हार्बर प्रोजेक्ट आदी प्रकल्पामुळे मुंबईत दळणवळणांची साधने उपलब्ध होणार आहेत. उद्योगांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. उद्योग वाढल्यास रोजगार वाढेल आणि राज्याची प्रगती होईल, असे श्री. देसाई म्हणाले.
राज्य शासनाच्या वतीने उद्योग वाढीसाठी विविध धोरणे राबवली जात असून त्यामुळे यावर्षी वर्ल्ड बँकेने सादर केलेल्या आकडेवारीत मोठी सुधारणा झाली आहे. यावर्षी भारताने सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

No comments

Thank you for your feedback.