Header Ads

ad

शेतकरयांना मदत जाहीर करा, त्यानंतर कामकाज होईल - धनंजय मुंडे

मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
कोरडवाहू शेतकर्‍यांना 50 हजार रुपये आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 1 लाख मदत जाहीर करावी, त्यानंतर कामकाज होईल, अशी भूमिका विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत मांडली. यावेळी मराठा, धनगर आरक्षण अहवालाबरोबर, मुस्लीम आरक्षण, मुंबईत धडकलेला शेतकरी मोर्चा यावरुनही विधानसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
विरोधकांनी विधानसभेत आरक्षणाच्या मुद्यावरुन आज सरकारला धारेवर धरले. या दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आक्षेप आणि स्पष्टीकरणाच्या शाब्दिक चकमकीही उडाल्या होत्या. तसेच आरक्षणामधील तरतुदींबाबतही विरोधकांनी प्रश्‍न उपस्थित केले होते. सरकार विधिमंडळ सुरू असताना मागासवर्गीय अहवाल आणत नाही, आरक्षणाविषयी सरकारची भूमिका अस्पष्ट असल्याचे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. ऊसतोड मजूरांसाठी गोपीनाथ मुंडेंच्या नावाने विमा योजना सुरू केली. परंतू आतापर्यंत या योजनेचा एकही लाभार्थी नाही. सरकारने याचे उत्तर द्यावे असे ते यावेळी म्हणाले.
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असे फक्त म्हटले आहे. परंतू, सरकार आरक्षण कोणत्या प्रवर्गातून देणार, त्याची टक्केवारी किती असणार आहे. याबद्दल स्पष्टता नाही. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव आणला होता. ही सूचना सभापतींनी नाकारली. त्यामुळे विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. गदारोळ वाढल्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. उद्या गुरुनानक जयंती, त्यानंतर शनिवार आणि रविवार असल्यामुळे आता सभागृहाचे कामकाज थेट सोमवारीच सुरु होणार आहे.

No comments

Thank you for your feedback.