Header Ads

ad

स्मार्ट सिटी आणि प्रदूषणमुक्त शहरासाठी महापालिका व महिंद्रा यांच्यात सामंजस्य करार

ठाणे,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
महिंद्रा अँड महिंद्राने ठाणे शहरात परिपूर्ण वाहतूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महानगरपालिकेशी आज सामंजस्य करार (एमओयू) केला. या करारानुसार, शहरात सर्वत्र परिपूर्ण आणि प्रदूषणविरहित वाहतूक सुविधा देण्यासाठी महिंद्राची इलेक्ट्रिक वाहने वापरली जाणार आहेत. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, महिंद्रा 100 इलेक्ट्रिक वाहने देणार असून ही भागीदारी 5 वर्षे कालावधीसाठी असणार आहे, अशी माहिती यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महिंद्रा अँड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका, अरविंद मॅथ्यू, आंतरराष्ट्रीय प्रकल्प अधिकारी कन्नन चक्रवर्ती आदी उपस्थित होते. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनच्या (आयएफसी) इको-सिटीज प्रोग्रॅमच्या पाठबळाने सर्वांसाठी शाश्‍वत वाहतूक सुविधा देण्यासाठी परिपूर्ण यंत्रणा उभारण्याच्या उद्देशाने, महिंद्रा आणि ठाणे महानगरपालिका संयुक्तपणे काम करणार आहेत. हा करार महिंद्रा अँड महिंद्रा लि. व महानगरपालिका यांच्यामध्ये करण्यात आला. या अंतर्गत वापरल्या जाणार्‍या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये नुकतीच दाखल झालेली ’ट्रिओ’ ही इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर आणि ’ई-सुप्रो’ ही मास पॅसेंजर कार समाविष्ट करण्यात येणार आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, की भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचे प्रवर्तक व ईव्ही मोबिलिटी सिस्टीमचे मार्गदर्शक म्हणून, हरित व स्मार्ट भविष्यासाठी आमची इलेक्ट्रिक वाहने वापरून शहराच्या शाश्‍वत विकासामध्ये योगदान देत असल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात वापरण्याच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी ठाणे महानगरपालिकेचे कौतुक करायला हवे. आम्ही एकत्रितपणे शहरातील वाहतुकीमध्ये परिवर्तन आणून स्मार्ट वाहतूक व स्मार्ट सिटीजच्या दिशेने वाटचाल करू, असा विश्‍वास गोएंका यांनी यावेळी व्यक्त केला.
या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना या वाहनांचा लाभ घेण्याची सुविधा बुकिंगद्वारे दिली जाणार आहे. यासाठी अनुकूल असणारी यंत्रणा पुरवण्यासाठी आणि चार्जिंग स्टेशन बसवणे आवश्यक आहे. यासंदर्भात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी व जागा उपलब्ध करण्यासाठी महानगरपालिका आवश्यक तो पाठिंबा देणार आहे. या कराराचा भाग म्हणून महानगरपालिका इलेक्ट्रिक वाहनांसाठी महिंद्राने प्रस्तावित केलेल्या चार्जिंग सुविधा ठिकाणांपासून जवळ पार्किंग सुविधाही उपलब्ध करुन देणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी विजेचे दर कमी असावेत. तसेच या प्रकल्पाची सुरळित अंमलबजावणी व्हावी, यासाठी टीएमसी पॉवर युटिलिटी कंपन्या व अन्य भागीदार यांच्याशी समन्वय साधणार आहे.

No comments

Thank you for your feedback.