Header Ads

ad

मुंबईत 25 नोव्हेंबरला संविधान बचाव रॅली, बाबासाहेबांच्या राजगृहापासून चैत्यभूमीपर्यंत रॅली

मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींना प्रणाम करुन त्यांच्या संविधानाच्या पालखीचे भोई होणार असून देशातील वाढत्या फॅसिझमच्याविरोधात युनायटेड यूथ फ्रंटच्या माध्यमातून युवकांचा हा लढा तीव्र करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केले.
देशातील 14 राजकीय प्रमुख युवा संघटना एकत्र येवून ‘यूनायटेड यूथ फ्रंट’च्या माध्यमातून ही संविधान बचाव रॅली आयोजित करण्यात आली आहे. ही संविधान रॅली 25 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता निघणार असून त्यासंदर्भाची माहिती देण्यासाठी ‘युनायटेड यूथ फ्रंट’च्यावतीने पत्रकार परिषद विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या बंगल्यावर घेण्यात आली.
संविधान बचाव रॅली ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहापासून सुरु होवून चैत्यभूमीपर्यंत जाणार आहे. या रॅलीमध्ये 14 युवा संघटनांसह गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दीक पटेल, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूमधील विदयार्थी संघटनेचे नेते कन्हैयाकुमार उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी युनायटेड युथ फ्रंटची भूमिका सांगितली आणि या फ्रंटला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते- पाटील, काँग्रेसचे मुंबई युवक अध्यक्ष गणेश यादव, युवक काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्ता, राष्ट्रवादीचे मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष रविकांत वरपे, शैलेश मोहिते पाटिल, सरचिटणीस सूरज चव्हाण आदींसह समविचारी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

No comments

Thank you for your feedback.