Header Ads

ad

अध्यादेश काढून राम मंदिर निर्माणाची तारीखच घोषित करा ˆ सामना

मुंबई,23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम मंदिराच्या निर्माणाबाबत अयोध्येला निघाले असून शिवसेनेला याचे श्रेय मिळू नये, यासाठी रोखण्याचे काम होत आहे. कुणाचे ब्लडप्रेशर आमच्या अयोध्या यात्रेने वाढले असेल तर त्यांनी राम मंदिर निर्माणाची तारीख घोषित करावी, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून सुनावले आहे.
आमच्या अयोध्यात जाण्याची घोषणा करताच स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेणार्‍यांच्या पोटात दु:खत आहे. कुणाचे मन, मेंदू आमच्या अयोध्या यात्रेने भरकटला आहे तर राजकीय हिंदुत्वाची मुठीतील वाळू सरकू लागल्याने काहींच्या काळजाचे ठोके वाढले आहेत. राममंदिर हा विषय असा हातून निसटू लागला तर 2019 च्या रोजीरोटीचे काय, या पक्षघाती झटक्याने अनेकांच्या जिव्हा पांगळ्या झाल्या. तेव्हा शिवसेनेस काहीही करुन रोखा अशी गिधाडे ज्यांच्या मनात फडफडू लागली आहेत त्यांना आमचा पुन:पुन्हा तो आणि तोच सवाल आहे की, हे एवढे कष्ट घेऊन कारस्थान करण्यापेक्षा सरळ अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
मतांचा कटोरा रामाच्या नावावर घेऊन दारोदार फिरावे व निवडणुकांचा मोसम येताच सभा-संमेलनातून जय श्री रामच्या घोषणा द्याव्यात असली जुमलेबाजी आमच्या रक्तात नाही. हिंदुपदपातशाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाचे रक्त आमच्या धमन्यात आहे. आणि त्याच शिवरायांच्या जन्मस्थान शिवनेरी किल्यावरुनच मातीचा कलश घेऊन आम्ही अयोध्येत निघालो आहोत. अयोध्या मक्का-मदिनेत नसून ती पवित्र हिंदू भूमितच आहे. अयोध्या ही कुणाची खासगी जागा नाही. अयोध्या आता रामराज्य राहिले नसून सर्वोच्च न्यायालयाचे राज्य आहे. 1992 साली राम जन्मभूमीवरील बाबरचे राज्य हातोड्याने उद्धवस्त करण्याचे कार्य शेवटी बाळासाहेबांच्या वीर शिवसैनिकांनीच केले आहे. त्यामुळे सध्याच्या राज्यकर्त्यांनी शिवसैनिकांचे भय, द्वेष वाटण्याऐवजी अभिमानच वाटायला हवा असा आरोपही ठाकरे यांनी सामनातून केला आहे.

No comments

Thank you for your feedback.