Header Ads

ad

हुंकार सभेसाठी हिंदूत्ववादी संघटना सरसावल्या

नागपूर,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातूनच अयोध्येतील राम मंदिर निर्मितीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित आंदोलनाची सूत्र हलवली जात आहेत. 25 नोव्हेंबरला आयोजित हुंकार सभेसाठी हिंदू संघटना एकवटल्या आहेत. त्यांना एकत्र आणण्यात संघ मोठी भूमिका पार पाडत असून केंद्रावर दबाव वाढवण्याच्या दृष्टीने देखील पराकोटीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठी संघ परिवारातील संस्था वातावरण निर्मिती करीत आहेत. राममंदिरासाठी अयोध्या, बंगळुरू व नागपुरात हुंकार सभा होणार असल्या तरी नागपूर हे हुंकार सभेच्या केंद्रस्थानी राहणार आहे. हुंकार सभेच्या माध्यमातून शंखनाद करण्यात येणार आहे. या सभेसाठी संघ परिवारातील संघटनांनी कंबर कसली आहे. हिंदूंना एकत्रित करण्यासाठी सोशल मीडियात ’वन-टू-वन’ संपर्क अभियान राबविले जाते आहे.
राम मंदिराच्या निर्मितीसाठी 25 नोव्हेंबर रोजी आयोजित हुंकार सभेत तरुणाई जास्तीत जास्त प्रमाणात यावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याकरीता भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विश्‍व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या रेशीमबागेतील ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात होणार्‍या हुंकार सभेला साध्वी ॠतुंभरा, शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांच्यासह अनेक साधू-संथ उपस्थित राहतील. याआधी लोकांना एकत्रित करण्याच्या उद्देशाने शहरात 2 ठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. तर बैठकांच्या माध्यमातूनही लोकांना हुंकार सभेसाठी एकत्रित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

No comments

Thank you for your feedback.