30 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण द्या, ’अन्यथा 1 डिसेंबरपासून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करु’
मुंबई,22 नोव्हेंबर (पीएसआय)
कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता, राज्य सरकारने मराठा समाजाला येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण द्यावे. अन्यथा 1 डिसेंबर 2018 पासून संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी दिला.
येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही, तर 1 डिसेंबर 2018 पासून संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाला सरकार जबाबदार असेल. भाजप सरकारने सर्वांशी चर्चा करून घटनात्मक व न्यायालयात टिकेल, असे कायमस्वरूपी आरक्षण द्यावे. आरक्षण कसे द्यायचे, किती द्यायचे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतू, आम्हाला 30 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी घेतली. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
इतर समाजाच्या नेत्यांना विनंती आहे, की त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करू नये. त्यांनी संपूर्णपणे आम्हाला पाठिंबा द्यावा. आमचाही तुमच्या समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हेच आमचे म्हणणे आहे. राज्य सरकारने याच अधिवेशनात आरक्षणासंबंधी कायदा मंजूर करून समाजाला आरक्षण द्यावे. परंतू, सरकारने आणखी सुद्धा मराठा आरक्षणाचा अहवाल सादर सभागृहात सादर केलेला नाही. त्यामुळे सर्व आमदार, खासदार, तसेच विरोधी पक्षनेते संभ्रमावस्थेत आहेत.
विधानसभेचे 288 आमदार व विधान परिषदेचे 78 आमदार यांनी मराठा आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे पुन्हा एकदा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनीही मराठा आरक्षणाचा अहवाल सभागृहात सादर करून, सर्वानुमते कायदा मंजूर करून मराठा समाजाला घटनात्मक व न्यायालयात टिकेल असे कायमस्वरूपी आरक्षण द्यावे. भाजप सरकारने निवडणुका जवळ आल्या आहेत, हे लक्षात ठेवावे. आरक्षण जर मिळाले नाही तर संपूर्ण मराठा समाज येणार्या निवडणुकांमध्ये भाजप सरकारला घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
Post a Comment