Header Ads

ad

तांत्रिक प्रदर्शन देश-विदेशातील प्रगत तंत्रज्ञानाचा आविष्कार - नितीन गडकरी

नागपूर,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
इंडियन रोड काँग्रेसच्या वतीने आयोजित अधिवेशनाच्या माध्यमातून देश-विदेशातील रस्ते बांधणी तंत्रज्ञानाची ओळख देशातील प्रत्येक अभियंत्याला होणार. हे अधिवेशन भविष्यातील प्रगत तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे. या भांडाराद्वारे येत्या काळात रस्ते बांधणीच्या विविध नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन देशातील रस्ते आणि नागरी सुरक्षिततेचा प्रश्‍न सोडविण्यात यशस्वी होऊ, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मानकापूर स्थित विभागीय क्रीडा संकुल येथे इंडियन रोड काँग्रेसच्या वतीने आयोजित 79व्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तांत्रिक प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) चंद्रशेखर जोशी, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधीक्षक अभियंता रमेश होतवानी, आयआरसीचे सचिव निर्मल कुमार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तांत्रिक प्रदर्शनाचे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच स्टॉलचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर तांत्रिक प्रदर्शनात लावण्यात आलेल्या विविध स्टॉल्सला त्यांनी भेट देऊन स्टॉल्सच्या माध्यमातून अधिवेशनात आलेल्या रस्ते सुरक्षासंबंधी नवनवीन तंत्रज्ञानाची त्यांनी माहिती घेतली.
आयआरसीच्या तांत्रिक प्रदर्शनात 60 हून अधिक कंपनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध प्रादेशिक कार्यालयांच्या वतीने स्टॉल्स लावण्यात आले आहेत. नागरी अभियांत्रिकी क्षेत्रात झालेल्या बदलांची संपूर्ण माहिती प्रदर्शनामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे चलचित्र दर्शविणारा एमएसआरडीसीचा स्टॉल, नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्टॉल, विश्‍वेश्‍वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑॅफ टेक्नॉलॉजी, मेट्रो यांच्यासह मदर डेअरीचे विविध उत्पादन व विदेशातील विविध कंपन्यांची रस्ते बांधणी, सुरक्षा तसेच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणारे स्टॉल्स पाहण्याकरिता पहिल्याच दिवसापासून अभियंत्यांसह नागरिकांनी गर्दी केली होती.
विजेत्यांचा पुरस्कार देऊन सन्मान
आयआरसीच्या तांत्रिक प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी इंडियन रोड कांग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पुरस्कृत करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता उल्हास देबडवार, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधीक्षक अभियंता रमेश होतवानी, आयआरसीचे सचिव निर्मल कुमार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांच्या हस्ते रस्ते सुरक्षा जनजागृती प्रश्‍नमंजूषा कार्यक्रमांची विजेता लीना भाटे, सर्वोत्कृष्ट पथनाट्य प्रस्तुतीकरिता दृष्टी लर्निंग सेंटर स्कूल, निबंध स्पर्धेत पूनम चौधरी, भित्तीचित्र स्पर्धेत फाईन आर्ट श्रेणीत राहुल गेडाम तसेच महाविद्यालय गटामध्ये सेल्वन फ्लोरील यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
‘सोनू, तुला इंजिनिअर वर भरोसा नाय काष्ठ’
तांत्रिक प्रदर्शनाच्या उद्घाटन समारोहप्रसंगी शंकर शंखपाळे दिग्दर्शित प्रकाश देवा लिखीत ‘सोनू, तुला इंजिनिअर वर भरोसा नाय काष्ठ’ नाटक प्रस्तुत करण्यात आले. यामध्ये रस्ते बांधणीकरिता वापरण्यात आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे आधीच्या तुलनेत आता लांबचा प्रवास कमी वेळात आणि सुरक्षित कसा झाला, याविषयी माहिती देण्यात आली. सुचिता देबडवार, स्मिता बोरकर, सीमा देव, भारती कुंभलवार, शेफाली पुंजरवार, पल्लवी उरकुडे, वैशाली गोडबोले, संगीता होतवानी व चित्रा महाजन यांच्या अभिनयाने अभियंत्याचे काम किती जोखमीचे आणि विकासात्मक दृष्टीकोनाबरोबर नागरिकांच्या सुरक्षितेवर आधारित असते, त्याबाबत त्यांनी संदेश दिला. नाटकाला संगीत जवाहर मनगटे यांनी दिले.

No comments

Thank you for your feedback.