Header Ads

ad

नदीच्या पाण्यासाठी उपोषण, सांगोल्यात कडकडीत बंद

पंढरपूर,24 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
दीपक पवार आणि दत्त टापरे हे सांगोल्यातील दोन तरुण नदीच्या पाण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. टेंभू योजनेद्वारे माण नदीतील बंधारे भरून देण्याच्या मागणीसाठी त्यांनी जनावरांसह हे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सांगोला शहर व तालुक्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
दोन तरुणांनी सुरु केलेल्या या आंदोलनाला आसपासच्या गावांमधील लोकांनीदेखील पाठिंबा दर्शवला आहे. 14 गावांमधील शेतकरी आपल्या जनावरांसह तहसील कार्यालयासमोर तळ ठोकून बसले आहेत.
काल पुण्यात या मागणीसाठी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने परिस्थिती चिघळत चालली आहे. प्रशासनावरील ताण वाढत चालला असताना जलसंपदा विभागाकडून मात्र योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
टेंभू योजनेतील पाण्याने बलवडी पासून मेथवडेपर्यंतचे बंधारे कमीतकमी 25  भरुन देण्याची शेतकर्‍यांची मागणी आहे. यासाठी राज्यमंत्री शिवतारे यांच्या बैठकीतदेखील दोन तासांच्या चर्चेनंतर तोडगा न निघाल्याने आता सोमवारी मुख्यमंत्री याबाबत हस्तक्षेप करतील अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे.
सांगोल्यात सध्या भीषण पाणीटंचाई असल्याने पशुधन व शेतातील पिके वाचवण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरु आहे. तसेच पाणी आल्याशिवाय उपोषण मागे घेण्यास आंदोलकांनी नकार दिला आहे. सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख सोमवारी या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्याना भेटणार आहेत.

No comments

Thank you for your feedback.