Header Ads

ad

उद्धव ठाकरे अयोध्येसाठी मुंबईतून रवाना

मुंबई 24 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
रामाची जन्मभूमी अयोध्येत शनिवारी हालचालींना वेग आलाय. राम मंदिराच्या निर्माणाची मागणी घेऊन शिवसेना आणि विश्‍व हिंदू परिषद वेगवेगळे कार्यक्रम करत आहेत. उद्धव ठाकरे दुपारी अयोध्येला दाखल होणार आहेत. यासाठी ते सध्या मुंबईतून रवाना झालेत. दरम्यान, धास्तावलेल्या मुस्लिम समुदायाच्या लोकांनीही या दरम्यान काहीतरी अनर्थ घडू शकण्याच्या शक्यतेमुळे आपल्या घरात गरजेच्या वस्तू जमवणं सुरू केलंय. अयोध्येत पुढचे दोन दिवस असंच वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली जातेय.
शिवसेनेनं इथं ’आशिर्वाद मेळाव्या’चं आयोजन करत आहे तर विहिंपनं रविवारी धर्मसभेचं आयोजन केलंय. यासाठी शेकडो शिवसैनिक महाराष्ट्रातून दोन रेल्वेंतून अयोध्येत दाखल झालेत. दरम्यान, अयोध्येत शनिवारी शिवसेना आणि रविवारी होणार्‍या विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमामुळे वातावरण तणावग्रस्त झालंय. याच दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक बोलावलीय. ही बैठक शनिवारी लखनऊमध्ये सायंकाळी उशिरा आठ वाजता होणार आहे. या दरम्यान मुख्यमंत्री योगी एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल होती. इथं ते साधुसंतांची भेट घेऊन सायंकाळी 6 वाजता सरयू घाटावर आरतीत सहभागी होतील. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित असणार आहेत. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास ते राम जन्मभूमीत रामललाचे दर्शन करतील. शिवसेनेच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दोन रेल्वे भरून शिवसैनिक अयोध्येत दाखल झालेत. पहिली रेल्वे काल पोहचली होती तर दुसरी रेल्वे आज सकाळी 7.15 वाजता अयोध्येत दाखल झाली.

No comments

Thank you for your feedback.