Header Ads

ad

चांगल्या गोष्टीसाठी मित्राने केलेल्या स्पर्धेत गैर काय? : मुनगंटीवार

मुंबई,24 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपल्या मित्राने आपल्याशी स्पर्धा केली, तर त्यात गैर काहीच नसतं. राम मंदिर बांधण्याच्या हेतूने जर उद्धव ठाकरे अयोध्याला गेले असतील, तर त्यात गैर काहीच नाही. यात स्पर्धा किंवा कुरघोडीचा प्रश्‍नच येत नाही, असं भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
अयोध्येत राम मंदिर निर्माण व्हावं ही देशातल्या प्रत्येक हिंदूच्या मनातली भावना आहे. शरयूच्या काठावर आज उद्धव ठाकरे जी महाआरती करणार आहेत, त्याचा देशाचा नागरिक म्हणून मला आनंदच आहे, अशा भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येला गेले आहेत.
भाजपचा जो विचार आहे, तोच शिवसेनेचाही आहे. आमच्या विचारात समानता आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह ज्यासाठी आग्रही आहेत, तोच आग्रह उद्धव ठाकरेंचाही आहे, असं सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं.
’पहले मंदिर, फिर सरकार’ ही उद्धव ठाकरेंची भूमिका असू शकते. याचा अर्थ मंदिर बांधण्याचं काम लवकर सुरु व्हावं, निवडणुका घेऊ नये किंवा शिवसेना-भाजपने एकत्र येऊ नये, असा उद्धव ठाकरेंना अभिप्रेत नसावा, असा दावाही मुनगंटीवारांनी केला.
प्रभू रामचंद्रच्या कृपेने आमच्यातील छोटे-मोठे मतभेदही दूर होतील. आधी जर युतीसाठी ’स्टेट हायवे’ होता, तर आता अयोध्याच्या निमित्ताने ’राष्ट्रीय मार्ग’ तयार होईल, अशी आशाही सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केली.
राम मंदिर हा मताचा विषय नाही, ती कोट्यवधी जनतेच्या मनाची आस्था आहे. निवडणुकीचा मुद्दा फक्त आणि फक्त विकासाचा असू शकतो. दीन-दुर्बलांना न्याय मिळावा, वंचितांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य मिळावं, हा निवडणुकीचा मुद्दा असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.
राम मंदिर हा राजकारणाचा नाही तर राष्ट्रकारणाचा मुद्दा आहे. मंदिर हा एका पक्षाचा विषयच नाही, यासाठी सर्वपक्षीयांची बैठक घेऊन एकमत केले पाहिजे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी भावूक झाले. तर, मताचं राजकारण बाजूला ठेवून हिंदुत्वाच्या बाजूने जे येतील त्यांना सोबत घेऊ, असं वक्तव्य भाजपसोबत युतीबाबत बोलताना मनोहर जोशींनी केलं होतं.

No comments

Thank you for your feedback.