Header Ads

ad

देशाचे संविधान धोक्यात : कन्हैया कुमार

मुंबई,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
’राजधानी दिल्लीत देशाचे संविधान दिवसाढवळ्या जाळले गेले. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली गेली. तरीही याविरोधात कोणी आवाज उठवला नाही. केंद्रातल्या मोदी सरकारने यावर गप्प राहणे पसंत केले. याविरोधात एक शब्दही बोलले गेले नाही, वृत्तवाहिन्यांनी याची गंभीर दखल घेतली नाही, यावरुन हे स्पष्ट झाले आहे की देशातील हिंदू-मुस्लिम धोक्यात नसून संविधान धोक्यात आले आहे’, असे रोखठोक प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने आज मुंबईत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अभिनय अफलातून आहे. ते मुंबईत असते तर त्यांनी बॉलिवूड खूप गाजवले असते. मोदींना बेस्ट अ‍ॅक्टरचा अवॉर्ड मिळावा यासाठी आपण ऑस्करला विनंती करणार आहे, असा चिमटाही कन्हैया कुमारने काढला. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी यांनीही केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
’यूनायटेड यूथ फ्रंट’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ’संविधान बचाव रॅली’त सहभागी होण्यासाठी कन्हैया कुमार आज मुंबईत आला होता. संविधान दिनानिमित्त दादर येथील राजगृह ते चैत्यभूमी अशी ’संविधान बचाव रॅली’ काढण्यात आली. चैत्यभूमी येथे पोहोचल्यानंतर एका छोटेखानी सभेला उपस्थित यूवा नेत्यांनी संबोधित केले. यावेळी गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांसह 14 राष्ट्रीय पक्षांच्या युवा नेत्यांची उपस्थिती होती.
यावेळी कन्हैया कुमारने केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. मोदी मन की बात करतात पण कामाची बात करत नाहीत. भाजप सोडून देशातील सर्व राजकीय पक्षांनी संविधान बचाव रॅलीचे आयोजन केले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी म्हणाले की, देशाला विरोधी नेत्याची गरज नाही. कारण काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नाही. परंतु, ज्या देशात विरोधी नेता नाही त्या देशाची लोकशाही ही हुकूमशाहीकडे जाते. देशातील चांगले लोक शांत बसलेत म्हणून वाईट लोकांचा आवाज वाढला आहे. 2014 साली सत्तेत येण्याआधी मोदींनी देशातील जनतेला रोजगार निर्माण करण्याचे, महागाई कमी करण्याचे, प्रत्येकांच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचे आश्‍वासन दिले होते. यातील एकही आश्‍वासन मोदींनी पाळले नाही असे कन्हैया कुमारने म्हटले.
जातीयवादी भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी देशातील पीडित, शोषित, दलित, समाजाने एक व्हायला हवे, लाखोंच्या संख्येने एकत्र आलो तरच हा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचेल. सर्व जण एकत्र आले तर आगामी 2019 च्या लोकसभेत भाजपचा पराभव अटळ आहे. 2014 साली मोदींची लाट होती ती आता ओसरली असून भाजपच्या मतांची टक्केवारी सुद्धा घसरली आहे, असे कन्हैया कुमारने सांगितले. 5 राज्यांच्या निवडणुकांची घोषणा होण्याअगोदर भाजपच्या आयटी सेलच्या टिवटरवर या तारखा जाहीर होतात. नेटफ्लेक्स पेक्षा जास्त जाहिराती भाजपच्या टीव्हीवर दिसत आहेत. यावरून हे जुमलेबाज सरकार जाहिरातबाजीवर कसे कोट्यावधी रुपये खर्च करतेय हे दिसत असल्याचेही कन्हैया कुमार म्हणाला.

No comments

Thank you for your feedback.