Header Ads

ad

हे राम ! गेल्या पाच वर्षांत मुंबईतून 2 हजार 264 मुली बेपत्ता!

मुंबई,24 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
गेल्या पाच वर्षांत मुंबईतून 26 हजारहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता झाल्या. त्यापैकी 2 हजार 264 मुलींचा शोध अद्यापही लागला नाही. बेपत्ता मुली आणि महिलांचा शोध घेण्यास कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात दिली.
आमदार नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, अमल महाडीक, संजय सावकारे, दिपक चव्हाण, शशिकांत शिंदे, भारती लव्हेकर, अमित विलासराव देशमुख, राधाकृष्ण विखे-पाटील, अमीन पटेल, अस्लम शेख, नसीम खान, कालिदास कोळंबकर, अ‍ॅड. आशिष शेलार आणि अन्य आमदारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न अत्यंत गंभीर आहे. 2013 ते 2017 या कालावधीत मुंबईतून 26 हजार 708 मुली-महिला बेपत्ता असून हे प्रमाण 15 पटीने वाढले आहे. बेपत्ता मुली-महिलांमधील 2 हजार 264 मुलींचा अजूनही तपास लागला नसून 18 वर्षांखालील 228 मुलींचा अद्याप शोध लागला नसल्याचे सप्टेंबर 2018मध्ये निदर्शनास आले. हे खरे आहे का? असा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. बेपत्ता झालेल्यांपैकी 24 हजार 444 जणींचा शोध लागला तर 2 हजार 264 अद्यापही बेपत्ताच आहेत, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. लेखी उत्तरानुसार 5 हजार 056 अल्पवयीन मुलींचे एकतर अपहरण झाले किंवा त्या बेपत्ता होत्या. त्यांपैकी 4 हजार 758 सापडल्या तर 298 मुलींचा अद्यापही शोध सुरू आहे. अशाच प्रकारे 21 हजार 652 वयस्क महिलांपैकी 19 हजार 686 सापडल्या तर 1 हजार 966 जणी अद्याप बेपत्ता आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या मे 2013 मधील निर्देशांनुसार अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता झाल्याच्या तक्रारींची नोंद अपहरण म्हणून करण्यात येते. या बेपत्ता मुलींच्या शोधासाठी सरकारची 1098 क्रमांकाची हेल्पलाइन तसेच तीन संकेतस्थळेही कार्यरत आहेत. हरवलेल्या मुले-मुलींची माहिती 24 तासाच्या आत मुख्य नियंत्रण कक्षाद्वारे सर्व पोलिस ठाण्यात प्रसारीत केली जाते. जुलै 2015 ते जुलै 2017 या कालावधीत राबवण्यात आलेल्या 5 ऑपरेशान मुस्कान अंतर्गत 20 हजार 112 हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली.

No comments

Thank you for your feedback.