Header Ads

ad

अपेक्षां ऐवजी स्वीकार केला आणि फेटाळण्या ऐवजी चर्चा केली तर संवाद अधिक परिणामकारक होईल ˆ पंतप्रधान

मुंबई,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
अपेक्षां ऐवजी स्वीकार केला आणि फेटाळण्या ऐवजी चर्चा केली तर संवाद अधिक परिणामकारक होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन प्रसारीत झालेल्या मन की बात कार्यक्रमाच्या 50व्या भागात आपले विचार व्यक्त करतांना स्पष्ट केला. विविध कार्यक्रम किंवा सामाजिक माध्यमाद्वारे तरुणाईशी सातत्याने संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करत असतो, असेही त्यांनी सांगितले.
आकाशवाणी हे संपर्काचे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे सांगून, आकाशवाणीची इतर कुठल्याही माध्यमाशी तुलना होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. मन की बात द्वारे अनेक लोक चळवळींना प्रोत्साहन मिळाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
मन की बात मुळे समाजात सकारात्मकतेला मिळालेले अधिक प्रोत्साहन हे या कार्यक्रमाचे सर्वात मोठे योगदान असल्याचे एका सर्वेक्षणात सामोर आले आहे. हा कार्यक्रम कायमच राजकारणाशी संबंधित नसलेला राहीला आहे, असे ते म्हणाले.
मन की बात सुरु झाल्यापासून या कार्यक्रमात राजकारणाशी संबंधित काहीही नसेल, तसेच सरकार किंवा पंतप्रधानांची कुठलीही स्तुती नसेल, हे आपण ठामपणे ठरवले होते, असे मोदी यांनी सांगितले.
मन की बातच्या 50 भागांतून आपण पंतप्रधानांशी नाही, तर अगदी जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधत आहोत, अशी निर्माण झालेली भावना खर्‍या खुर्‍या लोकशाहीचे प्रतिबिंब आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
मन की बातमध्ये देशवासियांच्या भावना आणि आत्मा प्रतिबिंबीत होतात, असे सांगून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.
मन की बातमध्ये समावेश न होऊ शकलेली पत्रे आणि मुद्दे यांच्याकडे संबंधित विभाग लक्ष देतील असे प्रयत्न केले जात आहेत. प्रसार माध्यमांमुळे हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
रस्ते सुरक्षा, अमली पदार्थ विरहित भारत, सेल्फी विथ डॉटर या सारखे मन की बात मध्ये उपस्थित झालेले मुद्दे प्रसार माध्यमांनी उचलून धरले आणि त्यांचे लोक मोहिमांमध्ये रुपांतर झाले असे, पंतप्रधानांनी सांगितले.
उद्या साजर्‍या होणार्‍या राज्यघटना दिनाबद्दल बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, सर्वंकष आणि विस्तृत राज्यघटना देणार्‍या महान व्यक्तीमत्वांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे.
राज्यघटनाकारांमध्ये देशभरातल्या महान व्यक्तींचा समावेश होता. भारतीयांना सक्षम बनवणारी आणि गरीबातल्या गरीबाला समृद्ध बनवणारी राज्यघटना देण्यासाठी या महान व्यक्तींपैकी प्रत्येक जण कटीबद्ध होता, असे पंतप्रधान म्हणाले.
हक्क आणि कर्तव्य यांची सर्वंकष माहिती म्हणजे आपल्या राज्यघटनेचा अनोखा मुद्दा असल्याचे सांगून हक्क आणि कर्तव्य यामधील साधलेला समतोल आपल्या देशाला प्रगतीपथावर नेईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
पुढच्या वर्षी देश संपूर्ण मानवजातीचे हित चिंतणार्‍या गुरु नानक देवजी यांचे 550 वे प्रकाशपर्व साजरे करत आहे. या महान पर्वानिमित्त गुरु नानक देवजी यांच्याशी संबंधित सर्व तिर्थक्षेत्रांना जोडणारी रेल्वे गाडी सुरु करण्यात येणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारतवासियांना गुरु नानक देवजी यांना पाकिस्तानातल्या कर्तारपूर इथे आदरांजली अर्पण करण्यासाठी सहजरित्या जाता यावे, यासाठी कर्तारपूर कॉरिडोरची निर्मिती  करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

No comments

Thank you for your feedback.