Header Ads

ad

‘मैत्रेय समूह’ आर्थिक फसवणूक प्रकरण : ठेवींच्या मागणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
मैत्रेय समुहाकडून ठेवीदारांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी राज्यात 30 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांच्या तपासामध्ये समुहाच्या वित्तीय आस्थापनाच्या अभिलेखातून ठेवीदारांची माहिती उपलब्ध झाली असून पुढील तपास पोलीस यंत्रणेमार्फत सुरू आहे. त्यामुळे अद्याप आपल्या ठेवींच्या रक्कमेची मागणी दाखल न केलेल्या ठेवीदारांनी जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये अथवा जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून ठेवींच्या मागणीबाबत विहित नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलीस महासंचालकांनी केले आहे.
या फसवणूक प्रकरणात दाखल गुन्ह्यांचा तपास तसेच कार्यवाहीमध्ये समन्वयाच्या दृष्टीने पोलीस महासंचालक कार्यालयात सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 नुसार आतापर्यंत 308 मालमत्ता जप्त करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. या 308 मालमत्तांच्या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन कायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता तसेच सक्षम प्राधिकारी नेमण्यात आले आहेत.
या गुन्ह्यांचा तपास सुरू असून निष्पन्न झालेल्या उर्वरित मालमत्ता जप्त करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकार्‍यांमार्फत करण्यात येईल. त्यामुळे ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळण्यासंदर्भात अन्य व्यक्ती किंवा यंत्रणेकडे संपर्क न साधता पोलीसांकडे अर्ज सादर करावा, असेही कळविण्यात आले आहे.

No comments

Thank you for your feedback.