Header Ads

ad

अडीच फुटाचा नवरा, तीन फुटाची नवरी, एका लग्नाची धमाल गोष्ट...!

पंढरपूर,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
कार्तिक द्वादशीनंतर लग्नाचे मुहुर्त सुरु झाल्याने सध्या गावोगावी लगीनघाई सुरु झाली आहे. मात्र आज सांगोला तालुक्यातील अजनाळे गावात वेगळीच लगबग सुरु होती. अजनाळेत अडीच फूट उंचीचा नवरदेव आणि तीन फूट उंचीच्या नवरीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
या गावाला कायम हसवत ठेवणार्‍या लाडक्या विशालचे आज लग्न होते. एकवीस वर्षाचा विशाल भडंगे. उंचीने अडीच फुटापेक्षाही कमी. मात्र वाघ्यामुरळीच्या पथकात अफलातून कला सादर करणार्‍या विशालची ओळख अवघ्या पंचक्रोशीला आहे. विशालचे लग्न म्हणल्यावर सगळ्यांना प्रश्‍न पडला होता वधू नेमकी कोण? पण लग्नाची चिठ्ठी हातात पडल्यावर तो देखील उलगडा झाला. सांगोला तालुक्यातीलच वासुद अकोले येथील शारदा गेजगे हिची गाठ विशालशी बांधली होती. शारदा उंचीने विशालपेक्षा थोडी मोठी म्हणजे 3 फूट उंचीची आणि नववीपर्यंत शिक्षण घेतलेली आहे.
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात अशी म्हण खोटी नाही हे या गोड दांपत्याकडे पाहून नक्कीच पटेल. नवरदेवाच्या घरासमोर मांडव सजला होता. गावातील खंडोबा मंदिराजवळील कार्यालयात दुपारी लग्नासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ जमा होवू लागले होते. नवरदेवाने पारण्याआधी सगळ्यांच्या आग्रहावरुन झिंगाट वर ठेका धरत आपल्या लग्नाचा आनंद साजरा केला. तर दुसरीकडे वधू शारदाला महिलांनी हळद लावली. पारणे वाजत गाजत गावात गेले, यावेळी वरातीत तरुणाईनेही ठेका धरला. पारण्याला मारुतीचे दर्शन घेऊन नवरदेव अखेर घोड्यावरून कडेवर बसत थेट बोहल्यावर उभारला. वर्‍हाडी मंडळींनी विशाल व शारदाचा रुखवत पाहण्यासाठी देखील गर्दी केली.
वधूवरांची उंची पाहता कमी उंचीचा आंतरपाट घेऊन ब्राह्मण मंडळी चक्क मांडी घालून बसली होती. शेवटची मंगलाष्टका झाल्यावर दोघांनी एकमेकांना हार घातले आणि हा अनोखा विवाह संपन्न झाला. विवाहानंतर वधूवरांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी पाहुणे मंडळींनी गर्दी केली होती. या लग्नाला सांगोला तालुक्याच्या सभापती श्रुतिका लवटे यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य, विविध गावांचे सरपंच उपस्थित होते.

No comments

Thank you for your feedback.