Header Ads

ad

रामदास आठवलेही अयोध्येच्या वाटेवर, बौद्ध धर्मियांसाठीही जागा देण्याची केली मागणी

पुणे,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
शिवसेना आता अयोध्येत जाऊन पोहोचली आहे. उद्धव ठाकरेंना अयोध्येत चांगला प्रतिसाद मिळत आहे. बर्‍याच साधू संतांनी त्यांचं स्वागत केलं आहे. त्यामुळे मीदेखील एकदा अयोध्येला जाणार असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. दोन्ही धार्मिक गटांशी चर्चा करुन अयोध्येतील वादग्रस्त जागेचा प्रश्‍न सामोपचाराने मिटावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती देत त्यांनी बौद्ध धर्मियांसाठीही अयोध्येत जागा देण्याची मागणी केली आहे.
आठवले म्हणाले, की राम मंदिराच्या निर्माणासाठी उद्धव ठाकरे 2 दिवसांपासून अयोध्या दौर्‍यावर आहेत. त्यांच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो. परंतु, त्यांनी राम मंदिराचा विचार करत असताना मुस्लीम समाजाच्या भावनांचाही विचार करावा. त्यासोबतच अडीच हजार वर्षापूर्वी अयोध्येचा परिसर बौद्धभूमी होता. त्यामुळे काही जागा बौद्ध धर्मियांसाठीही द्यावी आणि कायमचा हा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी अयोध्येत राम मंदिर, मस्जिद आणि बौद्ध मंदिर उभारलं तरी काही फरक पडणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. राम मंदिराला आमचा अजिबात विरोध नाही. पण राम मंदिर बेकायदेशीररित्या उभारू नये. कायदा हातात घेऊन बाबरी मशीद पाडण्यात आली आणि त्यानंतर देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला. त्यामुळे, राम मंदिर प्रकरणातही न्यायालयाचा निकाल येण्याची वाट पाहावी, अन्यथा बेकायदेशीररित्या मंदिर उभारले, तर न्यायालय पुन्हा ते पाडण्याचे आदेश देऊ शकते. त्यामुळे हे प्रकरण शांततेत घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच सर्वच राजकीय पक्षांनी न्यायालयाच्या निकालाची वाट पहावी, असेही सांगितले.

No comments

Thank you for your feedback.