Header Ads

ad

अयोध्या दौर्‍यानंतर उद्धव ठाकरे मुंबईत परतले

मुंबई,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
अयोध्या दौर्‍यावरुन परतलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं मुंबईत आगमन झालं आहे. आज दुपारी 4 वाजता मुंबईत विशेष विमानाने उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय दाखल झाले. शनिवारी दुपारी मुंबईतून अयोध्या दौर्‍यासाठी फैजाबादकडे रवाना झाले होते.
उद्धव ठाकरे मुंबईत दाखल झाले त्यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मंत्री दिवाकर रावते, खासदार विनायक राऊत मुंबई विमानतळावर उपस्थित होते. मुंबईत आल्यानंतर लगेच उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह मातोश्रीकडे रवाना झाले.
अयोध्येतून निघण्याआधी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राम मंदिर नाही तर आता सरकारही नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अयोध्या दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अयोध्येत पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी प्रथम पोलीस प्रशासन, यूपी सरकार आणि उत्तर प्रदेशच्या नागरिकांचे आभार मानले.
ठसर्व काही कोर्टाच्याच हातात आहे, तर मग निवडणुकीत राम मंदिराचं आश्‍वासन का दिलं जातं?‘ असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. ‘निवडणुकांआधी सगळे राम-राम करतात, निवडणुकीनंतर आराम करतात,‘ असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावाला.
अयोध्येतून उड्डाणावेळी ठाकरे कुटुंब संभाव्य अपघातातून थोडक्यात बचावले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज दुपारी आपला दोन दिवसाचा अयोध्या दौरा आटोपून मुंबईकडे निघाले. यावेळी अयोध्या (फैजाबाद) विमानतळावरून त्यांचे विमान उड्डाण घेत असताना धावपट्टीवर अचानक नीलगाय आली. मात्र कोणत्याही अडथळ्याशिवाय विमानाने यशस्वी उड्डाण केले.
या घटनेची दृश्य त्याठिकाणी उपस्थित असलेल्या मीडिया प्रतिनिधींच्या कॅमेर्‍यात कैद झाली आहेत. यावेळी विमानात उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील आहेत.
विमानाच्या यशस्वी उड्डाणामुळे संकट टळले असले, तरी धावपट्टीवर अचानक नीलगाय कशी आली याची चौकशी होण्याची शक्यता आहे.

No comments

Thank you for your feedback.