Header Ads

ad

...तर शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडावे - जयंत पाटील

सांगली 24 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
आधी राम मंदिर, मग सरकार अशी घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. बोलतो तसे वागतो प्रमाणे उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून बाहेर पडावे, जोपर्यंत भाजप राम मंदिर बांधत नाही, तोपर्यंत सत्तेत सहभागी होऊ नये, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सेनेला दिले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव यांच्यावर निशाण साधला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येत जाऊन राम मंदिराची उभारणी करतील, अशी आमची अपेक्षा होती, पण त्यांच्या कार्यक्रमात मंदिर उभारणी किंवा विट रचण्याचा कार्यक्रमही नाही, अशी बोचरी टीका पाटील यांनी यावेळी केली.
आज राम मंदिर प्रश्‍न न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालय त्यावर निकाल देईल, पण देशात आणि राज्यात निवडून येताना शिवसेना-भाजपने विकासाची भाषा केली होती. त्या ऐवजी शिवसेना अयोध्याचा मुद्दा पुढे करत आहे. आता तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी राम मंदिर मग सरकार अशी घोषणा केली आहे. ही घोषणा जर खरी असेल तर शिवसेनेने आधी सरकारमधून बाहेर पडावे, भाजप जोपर्यंत राम मंदिरचा निर्णय घेत नाही तोपर्यंत सत्तेत सहभागी होऊ नये, अशी आपली विनंती असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपण जसे बोलतो तसे वागतो हे जर केले तर जनता आपल्यावर विश्‍वास ठेवेल, असे मत यावेळी जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

No comments

Thank you for your feedback.